संगीत विद्यालयाला जागा न दिल्याने विद्यापीठावर नाराजी

मुंबई : प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या  स्मारकावरून सुरू झालेला वाद ताजा असतानाच मुंबई विद्यापीठाने संगीत संशोधन केंद्राला लता मंगेशकर यांचे नाव दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.  विद्यापीठाने परवानगीविना नाव वापरल्याने मंगेशकर कुटुंबीयांनी पत्राद्वारे कुलगुरूंकडे नाराजी व्यक्त केली  आहे.

प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाइट  म्युझिक’ हे अभ्यास आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला मंगेशकर कुटुंबीयांनी विरोध दर्शवला आहे. मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्न असलेल्या आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्या ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालया’साठी विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिल्याने लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आता त्यांच्या नावे कोणतेही उपक्रम परस्पर हाती घेऊ नयेत, असे पत्र मंगेशकर कुटुंबीयांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांना दिले आहे.

लता मंगेशकर यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. हा निर्णय आम्हाला मान्य नसून यापुढे लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम परस्पर हाती घेऊ नये, असेही मंगेशकर कुटुंबीयांनी कळवले आहे.संगीताचा सखोल अभ्यास व्हावा या उद्देशाने दीनानाथ मंगेशकर  आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव  मंगेशकर कुटुंबीयांनी राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारनेही याबाबत पुढाकार घेऊन  मुंबईमध्ये हे महाविद्यालय उभे राहील असे जाहीर केले होते. सदर महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठाने पाच एकरचा भूखंड द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने विद्यापीठाला दिला होता; परंतु राज्यपालांनी त्यास मान्यता दिली नसल्याने विद्यापीठानेही  जागेबाबत स्पष्टता दिली नाही. नुकत्याच झालेल्या अधिसभेत शिवसेनेच्या अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेऊन जागा देण्याचे  कुलगुरूंकडून मान्य करून घेतले; परंतु त्याचे पुढे काहीही झाले नाही. हे महाविद्यालय उभे राहावे, ही लता मंगेशकर यांची इच्छा होती. त्यांच्या निधनानंतर विद्यापीठाने लता मंगेशकर यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु संगीत महाविद्यालयाला विद्यापीठाने सहकार्य केले नसल्याने आता लता मंगेशकर यांच्या नावे कोणतेही केंद्र सुरू करू नये, अशी भूमिका मंगेशकर कुटुंबीयांनी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e