नाशिकमधील सातपूर येथील लाहोटीनगरात एका उद्योजकाच्या घरी बाळाच्या मानेवर सुरा ठेवून दरोडेखोरांनी चक्क 50 तोळे सोने लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. उद्योजक बाबूशेठ नागरगोजे यांच्या घरी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे हाती मोठे घबाड लागल्याने दरोडेखोरांनी घरातल्या मंडळीसमोर डान्स केला. देवाला नमस्कार केला. तुमचा आणि आमचा देव सारखाच असा उपदेश करून भामटे पसार झाले.
उद्योजक घराबाहेर पडले अन्…
उद्योजक बाबूशेठ नागरगोजे कंपनीत जाण्यासाठी घराबाहेर पडले आणि बरोबर अर्ध्या तासानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या घरी पाऊल ठेवले. त्यांनी अगदोर घरातील महिलांना धमकावले. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. ऐवज कुठे ठेवलाय याची माहिती करून घेण्यासाठी दीड वर्षाच्या बाळाच्या नरड्यावर सुरा ठेवून धमकी दिली. घरातील सगळ्यांना देवघरात डांबले आणि ऐवज बळकावला.
घरात श्वान, पण सीसीटीव्ही नाही…
उद्योगक नागरगोजे यांच्याकडे रॅट व्हीलर जातीचा श्वान आहे. कोणीही आला की तो अंगावर भुंकतो. त्यामुळे अनेकांची त्यांच्या घरात पाऊल ठेवायचीही हिंमत नसते. दरोडेखोरांनी या श्वानाला काहीतरी खाऊ घातल्याचा संशय आहे. दुसरीकडे नागरगोजे इतके मोठे उद्योजक असूनही त्यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही बसवला नाही. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. उद्योजकांच्या माहितीतील व्यक्ती या दरोड्यात सहभागी असावा, अशी शक्यता वर्तवली जातेय.
0 Comments