कैद्यांनी बनविलेल्या पैठणींची परराज्यात मागणी ;साडेपाच हजारांपेक्षा जास्त कैद्यांना उद्योगातून रोजगार

 नागपूर : हातून कळत-नकळत गुन्हा घडल्याने शिक्षेच्या स्वरूपात राज्यातील कारागृहात जीवन कंठत असणाऱ्या कैद्यांमधील सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी राज्यातील कारागृह प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न केला. त्यातून राज्यभरातील कारागृहातील हजारो कैद्यांनी उत्पादनाचा भार उचलत राज्य कारागृहाला २ कोटी ६३ लाखांचा नफा मिळवून दिला. कैद्यांनी गेल्या तीन वर्षांत विक्रमी उत्पादन केले आहे.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या एकूण ६० कारागृहे आहेत. त्यात कैद्यांची संख्या जवळपास ३६ हजारावर असून, त्यापैकी शिक्षा झालेले नऊ हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. यापैकी साडेपाच हजारांपेक्षा जास्त कैद्यांना उद्योगातून रोजगार देण्यात आला, तर एक हजारापेक्षा जास्त कैद्यांना शेतीमधून काम देण्यात आले.

राज्यातील कारागृहात शिक्षा झालेल्या कैद्यांना सुतारकाम, शिवणकाम, लोहारकाम, यंत्रमाग, हातमाग, बेकरी, चर्मकला, धोबीकाम, कागद कारखाना, रंगकाम, रसायन उद्योग, मोटार सव्‍‌र्हिसिंग, मूर्तीकाम अशा उद्योगांच्या माध्यमातून काम दिले जाते. राज्यातील कारागृहाने २०१९ मध्ये २३ कोटींचे विक्रमी उत्पादन घेत ९७ लाखांचा नफा मिळवला. तर २०२० मध्ये २४ कोटींचे उत्पादन करून १० लाखांचा नफा मिळवला. २०२१ मध्ये ९ कोटींचे उत्पादन करीत ३१ लाखांचा नफा कैद्यांनी मिळवला होता.

कारागृहातील कोठडीत कैद्यांना फक्त बंदिस्त ठेवण्यात येत नाही. अनेक कैद्यांना हातून घडलेल्या पातकाचा पश्चाताप झालेला असतो तर काहींना सकारात्मक जीवन जगण्याची ओढ असते. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार म्हणून मिळालेली ओळख पुसून समाजात पुन्हा नव्याने जीवन जगण्याची आशा त्यांची असते. काही कैद्यांमध्ये कला, सुप्तगुण आणि हातात कलाकुसरीची किमया असते. कैद्यांमधील नकारात्मक भावना नष्ट करण्यासाठी कारागृह विभागाचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वत: एक पाऊल पुढे टाकून कैद्यांच्या कला-गुणांना वाव देण्याचे ठरवले होते. डॉ. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनामुळे कैद्यांच्या हाताला काम किंवा कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्याची परवानगी मिळाली होती. ‘कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच कारागृहात कैद्यांकडून शिल्प, वस्त्र, ब्रेड, वाहनांचे सुटे भाग तयार केल्या जातात.

घरगुती वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती

 घरगुती वापरात येणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू कारागृहात तयार केल्या जातात. अगदी दर्जेदार आणि सुबक असे फर्निचर कारागृहात तयार केले जाते. तसेच लाकडी शिल्प, देव्हारे, सतरंजी, टॉवेल, बेडशीट, हातरुमाल, आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. लाकडी टेबल, खुच्र्या, सोफा, दिवान, छपाई, पुस्तक बांधणी आदीला सरकारी कार्यालयांमधून मागणी असते. त्यामुळे वर्षभर कैद्यांच्या हाताला काम मिळते.

 कारागृहातील पैठणी राज्यात भारी

 राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई कारागृहात शिवणकाम व विणकाम विभागांत पैठणी साडी तयार करण्याचे काम केले जाते. पैठणी तयार करण्याचे काम नाजूक असते. जरीच्या काठावर नक्षीकाम करण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षित कैदीच पैठणीचे काम करतात. सुबक नक्षीकाम, रंग-संगतीवरून या साडीची किंमत ठरली जाते. पुणे-नागपूर कारागृहातील पैठणी राज्यात प्रसिद्ध असून तिला राज्यातूनही मोठी मागणी आहे.

टेलिरग व्यवसायातून ६ कोटींची मिळकत

 राज्यातील सर्वच कारागृहात टेलिरगचे काम केले जाते. यातून गेल्या तीन वर्षांत ६ कोटी ३८ लाखांची राज्य कारागृहाला मिळकत झाली. यामध्ये विविध कपडय़ांच्या कलाकुसरीपासून ते गणवेश शिवण्यापर्यंतचा समावेश आहे. कारागृहाने २०१९ मध्ये २ कोटी,२०२० मध्ये २ कोटी २७ हजार तर २०२० मध्ये १ कोटी ३७ हजार रुपयांचे उत्पादन घेतले. नागपूरच्या कैद्यांनी करोना काळात दर्जेदार मुखपट्टय़ांची विक्रमी निर्मिती केली. कैद्यांनी तयार केलेल्या मुखपट्टय़ांमधून कारागृह प्रशासनाला जवळपास आठ लाखांचा आर्थिक लाभ झाला.

नफा किती?

वर्ष            उत्पादन    निव्वळ नफा

 २०१९         २३ कोटी    ९७ लाख

 २०२०         २४ कोटी    १ कोटी

 २०२१         ९ कोटी     ३१ लाख

२०२२(फेब्रु.)  ६ कोटी     २७ लाख

सुधारणा व पुनर्वसन असे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. गुणवान कैद्यांच्या मदतीने कारागृहात विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. कैद्यांना स्वावलंबी करण्यावर प्रशासनाचा भर असतो. जेणेकरून कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e