शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी महापालिकेने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. फेब्रुवारीच्या प्रारंभी ४४ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाली होती. त्यावरील हरकती व सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल अशी स्थिती होती. सर्वसाधारणपणे प्रस्तावित रचनेत फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे बहुतेकांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला असताना उपरोक्त निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. सहाव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. याच सुमारास जाहीर झालेली प्रभाग रचना गुंडाळली जाण्याच्या मार्गावर आहे. अर्थात, त्याबाबत निवडणूक आयोग वा राज्य शासनाने कुठलीही सूचना केलेली नाही.
प्रचार करावा तर कुठे ?
ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. या निमित्ताने प्रचाराला अधिक वेळ मिळाल्याचे मानून इच्छुकांनी भेटीगाठी वाढविल्या असताना प्रभाग रचना रद्द झाल्यामुळे कुठे प्रचार करावा, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. कारण, नव्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल झाल्यास सध्याच्या प्रचाराचा उपयोग होईल की नाही, याची इच्छुकांना चिंता आहे.
0 Comments