राज्याचे, देशाचे आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी दोन्ही बाजूंनी काम होणं लोकशाहीत महत्वाचं असतं. पण दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षात हे चित्र पहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, पराकोटीचं वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचं अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“राष्ट्राच्या, सुरक्षेच्या तसंच अनेक मुद्द्यांवर जास्तीत जास्त एकमत करुन सभागृहाचं कामकाज पुढे नेलं पाहिजे,” असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे. “अनेक मुद्दे निवडणुकीच्या आधी जिवंत केले जातात. हिजाबचा मुद्दाही आला होता. काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत असे अनेक मुद्दे अचानक येतात आणि निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवरच आपण जोर देत असतो. निवडणुका त्यावरच लढवल्या जातात,” असं राऊत म्हणाले.पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “निवडणुका झाल्या की विकासावर बोलण्यास सुरुवात होते. पाच वर्षांनी पुन्हा जुन्या मुद्द्यांवर येतो. लोकांनाही आता सवय झाली आहे. गंगेत प्रेतं वाहून गेली तशी लोकंही वाहून जाताना दिसतात. हे चित्र देशासाठी चांगलं नाही. चार राज्यांमद्ये भाजपा आणि एकामध्ये आप जिंकली असून विजयाचं अजीर्ण होऊ नये, सत्कारणी लावावा. या देशात विरोधी पक्ष राहणं या देशाची आणि लोकशाहीची गरज आहे”.
सामनामधून मोदींचं कौतुक केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून यासंबंधी सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, “देशाचे पंतधान एका पक्षाचे नसतात हे त्यांना समजायला हवं. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना गुडघ्यापेक्षा खुजं करुन टाकलं आहे. हे मी आता म्हणत नसून अनेक वर्षांपासून सांगत आहे. मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच आहे, पण भाजपाने त्यांना खुजं करुन टाकलं आहे. ते फक्त आमचेच पंतप्रधान आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत, पक्षातल्या एका गटाचे आहेत असं वातावरण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी निर्माण केलं असून करतही आहेत”.
“पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असून एका पक्षाचं नाही. पंतप्रधानांची गेली काही भाषणं ऐकली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं. मी देशाचा नेता आहे असं त्यांनी स्वत:ला बजावलं पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.
0 Comments