याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंचवटीतील भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांचे पती धनंजय ऊर्फ पप्पू माने यांना धमकावत संशयित अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) याने पंचवटी पोलिस ठाण्यासह अन्य ठिकाणी खोटे अर्ज केले होते. यात पप्पू माने यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे माने यांनी पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात जबाबही लिहून देत आरोपांचे खंडन केले होते. मात्र, संशयिताने माने यांच्या मित्राची भेट घेत त्यांना सांगितले की, तुझा मित्र पप्पू माने यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून मी पोलिसांत तक्रार केली असून, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सांग. जर माने याने मला 15 लाख रुपये दिले तर तक्रार मागे घेतो, त्यात तडजोड करीत सात ते आठ लाख रोख व माझा एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावा, अशी मागणी केली.
यामुळे मंगळवारी (दि.5) मित्राच्या मध्यस्थीने माने यांनी संशयिताची भेट घेत मला विनाकारण का त्रास देतोय, अशी विचारणा केली. त्यावेळीदेखील संशयिताने माने यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यानंतरही संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून रकमेची मागणी केली. अखेर संशयिताने माने यांना धमकावल्याने माने यांनी त्यास नवीन आडगाव नाका येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेतून 50 हजार रुपये काढून दिले. मात्र माने यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत ही बाब व घडलेला प्रकार पंचवटी पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments