संजय राऊत यांचा 60 दिवस, तर खडसेंचा फोन 67 दिवस टॅप

राज्यात खळबळ उडवून देणार्‍या राजकीय नेते मंडळी आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन तब्बल 60 दिवस, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांंचा फोन तब्बल 67 दिवस टॅपिंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. यात संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करून कुलाबा पोलीस तपास करत आहेत. ज्या नेत्यांचे फोन टॅप केले त्यांचे जबाब आता पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप करण्यात आला होता. तब्बल 67 दिवस खडसे यांचा फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली.

खडसे यांच्यासोबतच त्यांच्या स्वीय सहायक आणि एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप करण्यात आल्याचे समजते. तर, संजय राऊत यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

कुलाबा पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. तर, या दोन्ही नेत्यांना वेगवेगळी नावे देऊन हे फोन टॅप करण्यात आले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत असल्याने हे फोन टॅपिंग करणार्‍या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत दिलेल्या आदेशानुसार शुक्ला यांनी 16 आणि 23 मार्च या दोन दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविला आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e