नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे गुरुवारी (दि. ३१) रात्री १० वाजेच्या सुमारास स्वाती अंजना शेवगावकर यांच्या तमाशाची राहुटी अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थाचा वापर करून पेटून दिली. यामध्ये तमाशा फड मालकाचे सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत उशिरा तक्रार दाखल केली असली तरी पोलिस तपास करीत आहेत.
नारायणगाव ही तमाशा पंढरी म्हणून ओळखली जाते. येथील राहुटीला समाजकंटक यांनी आग लावली. दरम्यान ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र घडलेल्या प्रकारामुळे तमाशा फड मालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून आम्ही गरिबांनी कशी पोटे भरायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी त्वरित या समाजकंटकांना अटक करावी अशी मागणी फड मालकांनी केली आहे.
मागील दोन वर्षे कोरोनाच्या अडकीत्यात अडकलेली तमाशाची सुपारी यंदा फुटली. नारायणगाव याठिकाणी तमाशा फडमालकांनी आपल्या राहुट्या उभारल्या व त्या माध्यमातून जुन्नर, आंबेगाव, खेड तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील यात्रेच्या सुपार्या घेऊन गावकरी नारायणगावला येताना दिसत आहेत. तमाशा पंढरीत विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, काळू-बाळू, भिका- भीमा, आनंद लोकनाट्य, स्वाती शेवगावकर यासारख्या ३५ ते ४० फड मालकांनी आपल्या राहुट्या उभ्या केल्या आहेत. तमाशाच्या सुपारीचे प्रमाण कमी जरी असले तरी दोन वर्षांनी का होईना जत्रा भरणार व तमाशा कलावंतांना पुन्हा त्यांच्या हक्काचे दोन रुपये मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतानाच काही समाजकंटकांनी केलेल्या या प्रकारामुळे तमाशा फड मालक घाबरले आहेत. व्याजाने पैसे घेऊन उभारलेले तमाशा फड असा प्रकार झाल्यावर कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत दरम्यान, नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे व ग्रामपंचायत सदस्य, अँड. राजेंद्र कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच सर्व तमाशा फड मालकांनी प्रत्येकी हजार रुपये काढून शेवगावकर यांना मदत करण्याचे ठरवले आहे, असे आविष्कार मुळे यांनी सांगितले तर सरपंच पाटे यांनी नुकसान झालेल्या फड मालकास मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
0 Comments