सटाणा शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधाने फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. घमाजी रघुनाथ माळी (रा. पिंगळवाडे, ता. बागलाण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नाशिक : डोक्यात दगड घालून शेत मजुराची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा शहरालगत असलेल्या कंधाने फाट्यावर हा प्रकार (Nashik Crime) घडला. घमाजी रघुनाथ माळी असे मयत शेत मजुराचे नाव आहे. बाजारासाठी गेल्यानंतर घरी परतले नसल्याने कुटुंबीयांकडून घमाजी यांचा शोध सुरु होता. कंधाने फाट्यावरील एका शेतात रविवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचण्यात आले होते. हा मृतदेह घमाजी माळी यांचा असल्याचं समोर आलं. मात्र माळी यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी सटाणा पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?
सटाणा शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधाने फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. घमाजी रघुनाथ माळी (रा. पिंगळवाडे, ता. बागलाण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
घरी परत न आल्याने शोधाशोध
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोरेनगर शिवारातील शेतकरी सुदर्शन सोनवणे यांच्या शेतात शेत मजूर म्हणून काम करत असलेले घमाजी माळी शनिवारी बाजारहाटासाठी बाहेर गेले होते. मात्र रात्री उशीर झाल्यानंतरही पती घरी परत न आल्यामुळे पत्नीने त्यांचा सर्वत्र शोध सुरु केला. परंतु ते कुठेही आढळले नाहीत.
मोकळ्या जागेत मृतदेह
रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास कंधाने फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गुरुप्रसादच्या मागे मोकळ्या जागेत माळी यांचा मृतदेह सापडला. डोक्यात दगड घालून अतिशय निर्घृण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली होती.
घमाजी माळी शनिवारी रात्री कुठे गेले होते, कोणासोबत होते, त्यांचे कोणाशी वैर होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी पिंगळवाडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments