पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील तलाव पट्टा भागात मृत शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र हा वाद लगेचच मिटला. नंतर मात्र, सोमवारी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे आणि त्याच्या सोबत अन्य दोघे जण रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तलावकट्टा परिसरात आले.
यावेळी त्यांनी शुभमला बोलून घेत त्याच्यावर गुप्ती, खंजीर आणि लोखंडी पाइपने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर ते तिघेही फरार झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. तसेच, शहरात अफवांचे पेव फुटले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, व्ही. पी. विठूबोणे, जमादार संजय मार्के, शेख मुजीब, शेख अमजद, शेषराव पोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तिघांनाही खुशाल नगर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे आणि अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक विठूबोणे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments