राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडणार; सभेला सशर्त परवानी

सांस्कृतिक मंडळावर 1 मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अखेर गुरुवारी (दि. 28) पोलिसांनी परवानगी दिली. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही आणि 15 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना निमंत्रण देऊ नका यासारख्या 16 अटी घालून ही परवानगी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परवानगी मिळणार की नाही ? याचीच चर्चा रोज केली जात होती. दरम्यान, दोन दिवसांपासून मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील औरंगाबादेत तळ ठोकून बसल्याने सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सांस्कृतिक मंडळावर सभेच्या तयारीला जोर आला आहे. त्यातच, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आणि ग्राऊंडवरील रिपोर्ट तपासून सभेच्या परवानगीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, गुरुवारी गुप्ता यांनी तीन पोलिस उपायुक्त, काही सहायक पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यात त्यांना सभेला परवानगी दिल्याचे सांगून अटी व शर्थींचे पालन करण्याच्या सूचना केल्या. सभेसाठी घालण्यात आलेल्या अटी सभेसाठी 15 हजार जणांनाच निमंत्रण द्यावे सभा दुपारी साडेचार ते रात्री पावणे दहा या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करू नये. सभेत सहभागी होणाऱ्यांनी स्वयंशीस्त पाळावी. येताना व जाताना कोणीही हुल्लडबाजी, आक्षेपार्ह घोषणाबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेला कोणीही तलवारी, स्फोटके घेऊन येऊ नये, शस्त्र जवळ बाळगू नयेत. पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. पार्किंग व्यवस्था ठरलेल्या ठिकाणीच होईल. वाहनांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. अट क्र. 2, 3, 4 याची माहिती नागरिकांना देण्याची जबाबदारी संयोजकांची राहील. सभेसाठी संयोजकांनी स्वयंसेवक नेमावेत. त्यांचे मोबाइल क्र. पोलिसांना द्यावेत. बाहेरून येणाऱ्यांची माहिती सिटी चौक पोलिसांना कळवावी. सभास्थानाची आसनव्यवस्था 15 हजार नागरिकांची असल्याने त्यापेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करू नये. कुठल्याही अत्यावश्यक सेवांना (उदा : शहर बस, रुग्णवाहिका, दवाखाना, मेडिकल, वीज पुरवठा, पाणीपुरवठा, दळण-वळण आदी) बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी. सभेसाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून योग्य ती तपासणी करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. यात व्यत्यय येणार नाही. याची दक्षता घ्यावी. सभेत महिला व पुरुषांची स्वतंत्र आसन व्यवस्था असावी. तेथे स्वच्छता असावी. स्वच्छतागृहाचीही सोय करावी. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनीक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी. बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था अगोदरच करावी. सभेदरम्यान मिठाई, अन्नदान वाटप होत असल्यास. त्यातून विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणतीही व्यक्ती किंवा समुदायाचा अनादार होईल, असे वक्तव्य टाळा. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा. धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e