पाच दिवसांवर विवाह असताना तरुणाचा दुर्देवी अंत, नवरदेव बनण्याचं स्वप्न अधूरच राहिलं

विवाहाला केवळ पाच दिवस बाकी असतांना नवरदेवाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगावच्या एरंडोल येथे घडली आहे.

जळगाव, 20 एप्रिल : घरामध्ये लग्न असलं की प्रचंड आनंदाचं वातावरण असतं. लग्नाच्या निमित्ताने अनेक नातेवाईक घरी येतात. घरात प्रचंड उत्साह संचारलेला असतो. नवरदेव आणि नवरी तर एका वेगळ्याच आनंदात असतात. या आनंदावर विरझन पडू नये, असं नेहमी बोललं जातं. पण जळगावात एका कुटुंबाच्या या आनंदावर विरझन पडल्याची दुखद घटना समोर आली आहे. विवाहाला अवघे पाच दिवस बाकी असताना नवरदेवाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नवरदेव आणि नवरी दोन्ही परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवरदेवच्या आई-वडिलांचा आक्रोश पाहून आख्ख्या गावाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. 
एरंडोल येथील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश याचा विवाह 25 एप्रिलला होणार होता. घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन आणि त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना आज दुपारनंतर नवरदेव भावेश हा आपल्या काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला. तिथे त्याने काकांची दुचाकी मागितली. तुमची मोटरसायकल द्या, मी नाश्ता करायला जात आहे, असे सांगून भावेश काकांची दुचाकी घेऊन होता.

बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. पण तिथेही तो अद्याप घरी आला नव्हता. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी, नातेवाईक, मंत्रिमंडळी आणि घरातील इतर सदस्यांनी त्याचा शोध सुरु केला. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी त्यांचे काका ज्ञानेश्वर महाजन यांना फोन करुन दुखद बातमी सांगितली.

भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्याजवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे त्याच्या भावंडांनी काकांना सांगितलं. ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले. त्यांनी भावेशला परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी भावेशचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भावेशच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. भावेशच्या आईची अवस्था पाहून संपूर्ण गाव रडू लागलं. दरम्यान, संबंधित घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e