शहरातील कैलास टेकडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेशात लग्नासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपींना गजाआड केले असून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीची आईच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अधिक माहिती अशी की, कैलास टेकडी परिसरातील 13 वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता असल्याने मुलीच्या आईने खदान पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी तपास पथके तयार केली. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुलीचे लोकेशन राजस्थान, मध्यप्रदेश सीमेजवळ असल्याचे आढळून आले.
मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जन्मदात्या आईनेच मुलीला लग्नासाठी विकल्याचे तपासात समोर आले. पीडित मुलीच्या आईनेच तिला आरोपी कैलास घोपे (वय 28, रा. मांजरी, ता. बाळापूर) याच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर देवीबाई सावळे (रा. अकोट फाईल) व कैलास घोपे (रा. मांजरी) यांच्या मदतीने मुलीला मध्यप्रदेशात नेण्यात आले. या ठिकाणी मानसिंग चव्हाण (रा. जलारा, मध्यप्रदेश) याला लग्नासाठी विकण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन मुलीच्या आईसह चौघांविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला कलम 363, 366, 377, 34 नुसार गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात एपीआय गोपाल ढोले, डीबी पथकाचे डिगांबर अरखराव, विजय चव्हाण, रवी डाबेराव, रोहित पवार आदींनी केली.

0 Comments