“कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो तो…”, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी!

 राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, या सभेतून त्यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाला फायदेशीर भूमिका घेतलीये का? मनसे भाजपाची बी टीम आहे का? अशी टीका केली जाऊ लागली होती.

या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे आज उत्तर देणार असल्यामुळेच या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं आहे.

ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत त्या घरात करा. प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवावा, रस्त्यावर आणू नये. सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस, २४ तास हे नाटक, लफडं महाराष्ट्रात चालणार नाही. एक गोष्ट सांगतो. आत्ता हनुमान चालीसा सांगितलीये. पण माझ्या भात्यातला पुढचा बाण अजून मी काढलेला नाही. तो काढायला मला लावू नका. माझी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की जिथे समाजाला त्रास होतोय, असा कोणताही धर्म असता कामा नयेत. आपल्याला तेढ, दंगली करायच्या नाहीत.

मला भोंग्यांचं राजकारण करायची गरज वाटत नाही. हा देश, महाराष्ट्र साफ झाला पाहिजे. इथले वयस्क, लहान मुलं, अभ्यास करणारी मुलं यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नये. त्याच्यासाठी उद्या काही केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, तर माझ्यासकट आम्ही सगळे घेऊ. माझ्यावर शंभर-सव्वाशे आहेतच. अस्वलाच्या अंगावर अजून एक केस आला तरी काय फरक पडतो.

मराठेशाहीत अठरापगड जातीतले लोक शिवछत्रपतींनी जवळ आणले होते. त्यांच्याकडून, संतांकडून आम्ही घेतलेली शिकवण कुठे गेली? काय करतोय आपण? शाळेतली, कॉलेजमधली मुलं एकमेकांकडे जातीने बघायला लागलीयेत. महाराष्ट्राला कुणी हरवू शकलं नव्हतं. पण आता कोण हरवतंय? आमची जात? जातीतून बाहेर पडणार नसू, तर आपण मराठी कधी होणार? मराठी होणार नसू तर आपण हिंदू कधी होणार?



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e