लातूर: बालविवाह हा कायद्याने गुन्हा असतानाही एका १५ वर्षीय मुलीचा विवाह २८ वर्षांच्या तरुणासोबत लावून दिल्याची घटना लातुर (Latur) जिल्ह्यातील मुरुड परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि लातूर चाईल्ड लाईनच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत, मुलीचे आई-वडिल, नवरदेव, सासू, सासऱ्यासह लग्न लावणारा भटजी आणि मंडप डेकोरेशनवाला अशा ७ जणांविरुध्द मुरुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा गुंफावाडी (ता. लातूर) येथील नागनाथ नवनाथ इंगळे (वय (२८) या तरुणासोबत ता. २५ मार्च २०२२ रोजी बालविवाह झाल्याची तक्रार चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईनवर करण्यात आली होती. या तक्रारिच्या आधारे चाईल्डलाईनच्या वतीने सदर घटनेची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागास देण्यात आली.
माहिती मिळताच पथकासह गुफेवाडीचे उपसरपंच विष्णु महानवर, पोलीस पाटील राजेंद्र व्यंजणे यांच्यासह लग्न झालेल्या घरी पोचले. यावेळी तक्रारीत नमुद करण्यात आलेल्या मुलीची भेट घेतली असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवे आढळून आले. तिच्या वयासंदर्भात शाळेचा दाखला तपासला असता ती १५ वर्षे १० महिण्यांची असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सिमा इंगळे यांनी मुरुड पोलिसांत मुलीच्या आई-वडिलांसह नवरदेव नागनाथ नवनाथ इंगळे, मुलाचे वडिल नवनाथ राणचा इंगळे, मुलाली आई शोभा नवनाथ इंगळे यांच्यासह लग्न लावणारा भटजी आणि लग्नात मंडप डेकोरेशन करणारा डेकोरेशनवाला व्यक्ती असे ७ जणांविरुध्द तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वरिल सर्व आरोपीविरुध्द बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments