अहमदनगर : खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा पठण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 'उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत.', असं वक्तव्य राणा यांनी केलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राण यांच्या वक्तव्याच्या खरपूस समाचार घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली
आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही पक्षाचा असो महाराष्ट्रात सन्मानपूर्वकच त्यांचा उल्लेख केला जातो. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणारी ही कोण जोडी आहे ? महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडत नाही याची मला खात्री आहे, असं म्हणत थोरात यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विषयावरही थोरात यांनी भाष्य केलं. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ओबीसींचा विषय उच्च न्यायालयात आहे.जो डेटा आपल्याला द्यायचा आहे,तो आपण लवकरच देत आहोत. मला खात्री आहे,आपलाही निर्णय होईल आणि चांगला होईल.ओबीसीला न्याय देणारा निर्णय होईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही नवनीत राणा यांच्यावर टीका केलीय.
राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज आहे. जरा अमरावतीकरांकडे लक्ष द्या, नाहीतर निवडणुकीत हा शनी तुमच्यावर भारी पडेल. सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवाल असा कारभार चाललाय तुमचा", असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे
0 Comments