नंदुरबार - प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारामध्ये शेती पंपाच्या मोटरी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पंधरा दिवसात आठ मोटरी चोरीला गेलेले आहेत. दोन वर्षात शेकडो शेती पंपाच्या मोटरी चोरीला गेलेल्या आहेत. मात्र अद्याप एकही चोरीचा तपास न लागल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या शहादा रस्त्याला लागून गोमाई नदी आहे. त्या नदीच्या तीरावर प्रकाशा येथील शेतकरी हरी दत्तू पाटील व छोटू गोरख चौधरी यांच्या शेती पंपाच्या मोटारी ठेवल्या होत्या.
6 जूनचा मध्यरात्री भुरट्या चोरांनी त्या चोरून नेल्या आहेत. चोरून नेताना तिथे तोडफोड केलेली दिसून आली. या चोरीच्या प्रकारात मुळेच संबंधित शेतकऱ्यांचे प्रत्येकी 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना प्रकाशा गावात पहिली नसून या 15 दिवसांमध्ये आठ मोटरी चोरीला गेलेल्या आहेत. संबंधित शेतकरी पोलीस स्टेशनला फिर्याद देतो मात्र त्याचा तपास लागत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
एक वर्षापूर्वी देखील याच ठिकाणाहून हरी दत्तू पाटील व छोटू पाटील यांचा 10 एचपीची शेती पंपाच्या मोटर चोरीला गेली होती. त्याचाही तपास लागलेला नाही.आणि आता एक वर्षानंतर पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी घडली आहे.तसंच या ठिकाणी आठ ते दहा शेतकऱ्यांचा शेती पंपाच्या मोटरी ठेवलेले आहेत. 1 मे रोजी गावातील रामकृष्ण राजाराम चौधरी,व योगेश सुभाष पाटील यांच्याही मोटरी या ठिकाणाहून चोरीला गेलेले आहेत.
त्यांनी फिर्याद दिली मात्र तपास अद्याप लागलेला नाही.तसेच जवळ ट्रांसफार्मर आहे. त्या ट्रांसफार्मर मधील देखील दोन वेळा ऑइल चोरीला गेलेले आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी पैसा गोळा करून त्या ट्रांसफार्मर मध्ये ऑईल टाकून आपले काम केले होते. मात्र त्याच्या शोध लागला नाही.तसंच गोमाई नदीचा पलीकडे म्हणजे नांदरखेडा रस्त्यावर वाकेरा शिवारात काही शेतकऱ्यांनी तापीचे पाणी उचलण्यासाठी पाणीच्या मोटरी ठेवल्या होत्या. त्यामध्ये 13
मे रोजी अंबालाल रामू चौधरी यांची, तर 30 मे रोजी दिलीप दशरथ चौधरी, रामचंद्र लक्ष्मण चौधरी यांच्याही मोटरी चोरीला गेल्या आहेत. तसेच शहादा रस्त्यावर दोन जून रोजी सुरेश गोरख चौधरी यांचीही शेती पंपाची मोटर चोरीला गेली आहे. यांनी देखील फिर्याद प्रकाशा पोलीस क्षेत्राला दिली आहे. मात्र त्याचे तपास लागलेला नाही. प्रकाशा नांदरखेडा रस्त्यावर भेंडवा नाला आहे. त्या ठिकाणाहून 1 वर्षापूर्वी हरी दत्तू पाटील यांची सबमर्सिबलची मोटर व तार यांच्या शेतातून काढून नेले त्याचाही शोध लागलेला नाही.
या दोन वर्षाचा जर इतिहास बघितला तर शेतकऱ्यांच्या असंख्य मोटरी चोरीला गेलेल्या आहेत. मात्र आजपर्यंत एकाही चोरीच्या घटनेचा छडा पोलिसांकडून लागलेला नाही. यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे, त्यात चोरीला जाऊन नुकसान होणे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरतो आहे.चोरीचा तपास लागत नाही. म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या उरलेले इतर साहित्य प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचा ठिकाणी आणून ठेवले. प्रकाशा शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार तयार करून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील मेल केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये इतर घटनांचा चोरी उघडकीस येतात मग प्रकाशा परिसरामध्ये आत्तापर्यंत मोटरी चोरीला गेलेल्या आहेत याचा का शोध लागत नाही. अशी विचारणा दक्ष समितीचे जिल्हा सदस्य हरी दत्तू पाटील यांनी केला आहे. आठ दिवसांपूर्वीच प्रकाशा गावाचे माजी उपसरपंच भरत दशरथ पाटील यांच्या शेतातून शासनाकडून अनुदानवर घेतलेल्या 15 सौरऊर्जेच्या प्लेट चोरून नेले आहेत. त्याचे अद्याप तपास लागलेला नाही.
प्रकाशाहे चोरांचे माहेरघर झाले नाही ना अशी शंका आता प्रकाशा ग्रामस्थांना येत आहे.पंधरा दिवसापूर्वी दिवसाढवळ्या सोनार गल्लीमध्ये दोन महिला व दोन पुरुषांनी 74 ग्रॅम सोन्याची चोरी केली होती. वाढता चोरीचा घटनेचा प्रकार लक्षात घेता. प्रकाशा येथे पोलिस संख्या वाढवणे गरजेचे आहे. प्रकाशा येथे सध्या तरी तीनच पोलीस कर्मचारी आहेत. पैकी एक जण आरोग्याच्या सुट्टीवर असल्याकारणाने दोनच कर्मचारी आता दिसून येत आहेत. आता या शेतकऱ्यांचा शेती पंपाच्या छडा लागतो का याकडे लक्ष लागून आहे.
0 Comments