चुलत भावाच्या उपकाराची परतफेड, विधवा वहिनीसोबत संसार थाटून दिरानं दिला आधार

जामनेर (जळगाव) : तालुक्यातील ओझर येथील चुलत भावाने उच्च पदावर असताना नोकरी मिळवून दिली. उच्चपदस्थ चुलत भावाचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला सात जन्माची साथ देऊन चुलत वहिनीशी विवाह करून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला.
ओझर गावामधील महाजन परिवारातील एक उदयोन्मुख तरुण अनिल एकनाथ महाजन पुणे  येथे इंडस्लंड बँकेत मॅनेजर म्हणुन मोठ्या पगाराच्या नोकरीवर होता. मागील वर्षी जून महिन्यात त्यांचा चार चाकी वाहन चालवत असताना  अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी प्रियंका अनिल महाजन यांना दोन महिन्याची मुलगी होती. ती दोन महिन्याची मुलगी व प्रियंका यांचा फार मोठा आधार हरवला. तरुणाची पत्नी प्रियंका कमी वयात विधवा झाली. अशा वेळी परिवारावर फार मोठा आघात झाला होता.

परिवार होता चिंतेत

अनिल महाजन यांचे वडील व त्यांच्या विधवा पत्नीच्या माहेरील मंडळी प्रियंकाला कमी वयात आलेल्‍या विधवापणामुळे चिंतीत होते. त्याच वेळी ईश्वरलाल जैन पतसंस्थेचे अध्यक्ष कचरूलाल बोहरा यांचे महाजन परिवाराशी असलेले निकटचे संबंध असल्याने त्यांनी अनिताला पुनर्विवाहासाठी राजी केले. परंतु, तिच्याशी विवाह कोण करणार? अशी चर्चा आणि विचार विनिमय सुरू असताना प्रियंकाचा नात्याने दिर असलेला अविवाहित शुभम सुरेश महाजन यांच्याकडे याबाबत चर्चा केली असता त्याने लागलीच होकार दिला. तसेच त्याचे वडील सुरेश महाजन यांनी होकार दिला.

उपकाराची परतफेड

शुभमने लग्‍नाला होकार दर्शविण्याचे कारणही तसेच होते. कारण शुभम याला मृत चुलत भाऊ अनिल महाजन यांनी बँकेत नोकरीला लावून दिले होते. भावाच्या या उपकाराची परतफेड करण्याची हीच वेळ असल्याची भावना बोलून दाखवत लग्‍नास होकार दिला. दोघांचा विवाह करण्याचे ठरले अन्‌ २२ जूनला मध्यप्रदेशातील इच्छापुर येथील इच्छादेवीच्या मंदिरात यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला. तिला असलेल्या एकुलत्या एक मुलीचा पाच वर्षानंतर अनिलचे आई वडील सांभाळ करणार असून त्याचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. विशेष म्हणजे या विवाहासाठी पुढाकार घेतलेले कचरूलाल बोहरा ह्यांनी कन्यादान केले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e