मुंबईतून येऊन ‘तो’ डोंबिवलीत घरफोड्या करून जायचा; पोलिसांनी कामाठीपुरा भागातून केली अटक

 जवाहिऱ्यांच्या पेढ्यांसमोर बसून सोन्याचे दागिने वितळविण्याचा व्यवसाय करणाऱ्या मुंबईतील एका तरुणाला व्यवसायात तोटा झाला. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या तरुणाने डोंबिवली परिसरात येऊन घरफोड्या करून सोने आणि त्या सोबत मिळणारा किमती ऐवज चोरण्याचा धंदा गेल्या काही दिवसांपासून सुरू केला होता. मानपाडा पोलिसांनी मुंबईतील कामाठीपुरा भागातून या तरुणाला अटक केली.

हा तपास करताना इतर घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोन आरोपी टिळकनगर पोलिसांच्या तावडीत सापडले. काही महिन्यांपासून डोंबिवली, कल्याण परिसरातील घरे, कंपन्या, आस्थापनांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. या चोऱ्या कायम स्वरुपी केव्हा बंद होणार असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

अभिजीत अलोक रॉय (३६, रा. गल्ली क्र.१३, कामाठीपुरा, भायखळा, मुंबई), इम्रान अबलेश खान (२५, रा. ललित काट्याजवळ, माणगांव, डोंबिवली पूर्व) आणि रियाज रमजान खान (३६, रा. नई बस्ती, मेमन मश्जिद जवळ, डोंगरी पाडा, भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

टिळकनगर पोलीस ठाणे भागात राहणारे अमित झोपे कुटुंबासह पुण्यात कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी शय्या गृहातील कपाटातील १०० तोळे वजनाचे सोने-चांदीचे दागिने चोरून केले. झोपे यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक तैनात केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे यांच्यासह प्रशांत वानखेडे, राजेंद्र खिलारे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचद सोनवणे, विजय कोळी, प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, महेंद्र मंझा, शांताराम कसबे या पथकाने तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अभिजीत रॉय या इसमाला मुंबईतील कामाठीपुरा भागातून अटक केली.

१३ घरफोडीचे गुन्हे दाखल –

अभिजीतचा सोन्याचे दागिने वितळविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याला तोटा झाला. व्यवसायातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्याने चोरी करणे सुरू केले होते. डोंबिवली, वसई, विरार, मिरा-भाईंदर भागातील बहुतांशी रहिवासी नोकरीसाठी मुंबईत येतो. या भागातील घरे दिवसा बंद असतात. त्यामुळे या भागात दिवसा चोरी करणे सोपे असते असे गणित त्याने केले होते. मुंबईतून येऊन तो डोंबिवलीत चोरी करत होता, असे पोलीस तपासात उघड झाले. अभिजीतकडून ७१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे, २५८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केला. इतर ठिकाणी केलेल्या चोऱ्यांमधील ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अभिजीत विरुध्द मुंबई, मीरा भाईंदर, वसई, विरार भागात १३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

४० लाखांचा ऐवज हस्तगत –

तपास पथकाने इम्रान खान, रियाज खान यांच्याकडून दुचाकी, दोन मोबाईल, कॉपर, पॉलीकॅब वायर, पितळी वॉलसह गाडीचे सायलंन्सर असा मुद्देमाल हस्तगत केला. या दोघांनी मानपाडा, टिळकनगर पोलिस ठाणे हद्दीत १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४० लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e