भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूला बेवारसरीत्या पडून असलेल्या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा गुरुवारी रोजी येथील सुरक्षा यात्रांना मिळाली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना चांगलाच घाम फुटला. येथील स्थानिक स्तरावर बॉम्ब शोधक पथक नसल्याने जळगावच्या पथकाला माहिती देण्यात आली. एव्हाना रेल्वेच्या उत्तर बाजूचा परीसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला व वाहतूक थांबवण्यात आली. तर सायंकाळी सात वाजता बीडीडीएसच्या पथकाने संशयास्पद बॅगेची टायसन व वीरू या श्वानांद्वारे तसेच विशेष यंत्राद्वारे तपासणी केली व तासाभरानंतर बॅगेत काहीच नसल्याचा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर यंत्रणेसह भुसावळकर रेल्वे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूला असलेल्या आऊटर गेटजवळ (बाहेर पडण्याचा मार्ग) गुरुवारी दुपारी चार वाजता बेवारस बॅग पडून असल्याची माहिती रीक्षा युनियनचे पदाधिकारी भीमराव तायडे यांना यंत्रणेला दिली तर लोहमार्गचे कर्मचारी निकम यांनी पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांना बेवारस बॅगेची कल्पना देताच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात चार ते पाच प्रवाशांसोबत असलेल्यांपैकी एक प्रवासी काळ्या रंगाची बॅग बेवारसरीत्या सोडून देत असल्याचे दिसल्याने यंत्रणेचा संशय बळावला. स्थानिक पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकृष्ण मीना तसेच एसआयबी निरीक्षक आसीफ शेख यांनाही माहिती कळवताच अवघ्या काही मिनिटात यंत्रणा दाखल झाली.
0 Comments