परळी : मुलीची छेड काढल्याबाबत जाब विचारायला गेलेल्या आईची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. अनिता राठोड असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. बबन चव्हाण आणि राजाभाऊ चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बबन चव्हाण याने अनिता राठोड यांच्या मुलीची छेड काढली होती. याचाच जाब विचारण्यासाठी अनिता बबनकडे गेल्या होत्या. यावेळी त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि भांडणाचं पर्यावसन हत्येत झालं.
जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
काही दिवसांपूर्वी अनिता राठोड आणि त्यांचे पती तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना तांडा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे ठेवले होते. यावेळी बबन चव्हाण याने यातील एका मुलीची छेड काढली आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अनिता जेव्हा तिरुपतीहून परत आल्या तेव्हा मुलीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर संतापलेल्या अनिता राठोड बबनला छेडछाडीबद्दल जाब विचारण्यासाठी गेल्या. यावेळी अनिता आणि बबन यांच्यात जोरदार भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की बबनने महिलेच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अनिता गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनिता यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. आरोपीच्या अटकेसाठी रुग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना करत बबन आणि त्याच्या वडिलांना अटक केले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
0 Comments