केरळच्या पर्यटनाची जळगावात अनुभूती; येथे साकारले जातेय अनोखे बेट

जळगाव : शहराच्या वर्दळीपासून दूर. हिरवळीचा रम्य परिसर. सभोवताली पाणी. त्यात नौकाविहारासह हाऊसबोटिंग. आवडत्या खाद्यपदार्थांची रेलचेल. अगदी केरळमधील पर्यटनाची अनुभूती देणारे बेट आणि सुविधा जळगावात मिळाल्या तर. होय, ही स्वप्नपूर्ती जळगाव जिल्ह्यातच साकारतेय. काही महिन्यांत पूर्णत्वास येणारा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ खानदेशातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात ‘युनिक’ ठरणार आहे 
जळगाव शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर  वाघूर धरण आहे. धरणाचे बॅकवॉटर थेट जामनेरपर्यंत विसावलेले. जामनेर  तालुक्यासह जळगाव तालुक्यातील गावांसाठी हे धरण संजीवनी.
जामनेर तालुक्यातील गारखेडा शिवारात वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये २२ एकर जागेत हे आकर्षक बेट साकारतेय. प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधी या परिसरात सुमारे तीन हजार वृक्ष जगविण्यात आली आहेत. तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम होणार असून, पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटींच्या खर्चातून कामे होणार आहेत.

हाऊसबोट, बांबू हट्‌स

आसाम राज्याचे वैशिष्ट्य असलेल्या बांबूच्या झोपड्या (हट्‌स), धरणाच्या पाण्यात नौकाविहारासाठी वातानुकूलित हाऊसबोट तयार होतेय. ८० बाय १७ आकाराच्या या बोटमध्ये बेडरूम व अन्य सुविधाही आहेत. १०० व्यक्तींचा छोटेखानी कार्यक्रम होऊ शकेल, एवढी ही बोट आहे. सोबतच स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी देणारे रेस्टॉरंट, पाथ-वे यांसह २५ फुटांची भव्य महादेवाची मूर्तीही याठिकाणी स्थापन्यात आली आहे. पर्यटनासोबतच श्रद्धा-भक्तीचा संगम याठिकाणी पाहायला मिळेल.

दुसरा टप्पाही आकर्षक

दुसऱ्या टप्प्यातील कामात १५ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव आहे. त्यात तीन-चार बेडरूमसह हॉल, किचन, असे तीन व्हीलाज्‌ साकारण्यात येत आहेत. सोबत दोन हाऊसबोट व जलतरणाचा आनंद घेण्यासाठीची सुविधा असेल. डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. याठिकाणी बेट व रेस्टॉरंटचे काम लालरंगाच्या जांभा प्रकारातील दगडातून होत आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्य शासनाकडे २० कोटी व केंद्र सरकारकडे २५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, खानदेश, मराठवाडा, विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करेल, असे स्थळ याठिकाणी साकारेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जळगाव युनिटने या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e