धक्‍कादायक..सिकलसेल पीडीत महिलेला पोलिसांकडून जबर मारहाण; बेशुद्धावस्थेत केले रुग्णालयात दाखल

नंदुरबार : धडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत असताना तालुक्यातील सोनखुर्द गावातील जरीपाडा येथील सिकलसेल आजाराने पीडित महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकल सेल आजाराने पीडित असतांनाही बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याचा पराक्रम धडगाव पोलीस  ठाण्यातील उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी केला असल्याची तक्रार आहे 
मारहाण झालेल्या महिलेच्या पतीला अटक करण्यासाठी धडगाव पोलीस कर्मचारी सदरील सोन खुर्द गावात गेले होते. पती कामानिमित्त बाहेर गेला असता महिला एकटी घरात होती. तिला पतीबद्दल विचारणा करत पोलीस उपनिरीक्षकासह तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या कारवाईत महिलेला मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे महिलेच्या अंगावर दिसत आहे. कारवाईला गेलेल्या पोलिसांबरोबर एक महिला पोलीस कर्मचारीही होती. परंतु तिने न मारता पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी सिकलसेल पीडीत महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली असल्याचा आरोप पीडित महिला छाया राजेश पटले (वय २८, रा. सोनखुर्द जरीपाडा) हिने केला आहे. पोलीस कर्मचारी मारहाण करत असताना सदर महिलेने मारू नका मी आजारी आहे. अशा विनवण्या केल्या. परंतु पोलिसांनी तिचे काही न ऐकता मारहाण सुरूच ठेवली. वरून दम देत सांगितलं की तू आजारी आहे; त्याला आम्ही जबाबदार नाही. अशा शब्दात ताडण केल्याचा आरोप देखील तक्रारदार महिलेने केला आहे.

पोलिस स्‍टेशनसमोर केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

सदर महिलेचा पती घरी आल्यावर पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुद्धीवर आल्यावर महिलेने सर्व हकीगत आपल्या पतीला सांगितली. मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिसांनी पीडित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अखेर पीडित पती-पत्नीने पोलीस स्टेशन समोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उशिरा रात्री एफआयआर दाखल करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणीही चोरांच्या उलट्या बोंबा अशी घटना आहे. पीडित कुटुंबाच्या विरोधात पोलिसांनी ही क्रॉस कंप्लेंन केली आहे 

अवैध धंद्यांना अभय

धडगाव पोलिसांची विशेषता म्हणजे मध्यप्रदेश  राज्यातून धडगाव मार्गे गुजरात राज्यात होणाऱ्या दारू तस्करांकडून हप्ते घेऊन अभय देणे. आणि सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी आदिवासी पारंपारिक मोहू फुलांची दारू बनविल्यावर कडक कारवाई करणे. तसेच छोट्या मोठ्या अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुली करणे. हप्ता न दिल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करणे. आदींसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल याआधीही चर्चेत आले आहे. गेल्या आठवड्यात नंदुरबार पोलीस व नाशिक विभागीय पोलीस पथकाने. नवापूर तालुक्यातील जुगार अड्यावर टाकलेला छापा कारवाईचे ताजं उदाहरण आहे.

महिलेला न्‍याय मिळेल का?

मुंबई नाशिक विभागीय कार्यालयातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केवळ हप्ते वसुली करण्यासाठी कारवाईचे आदेश दिले जातात. त्यामुळेच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून दमदाटी देऊन असे प्रकार केले जात आहे. एका सिकलसेल आजाराने पीडित महिलेला मारहाण करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे सिकल सेल आजाराने पीडित महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारणाऱ्या पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करून मला न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e