मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारानजीक असलेल्या रोकडोबा हनुमान मंदिरात पायी जाणार्या दोघा जिवलग मित्रांवर आज सकाळी काळाने घाला घातला. अवधान शिवारात भरधाव वेगाने येणार्या ट्रकने दोघांना चिरडले एकाचा जागीच तर दुसर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजु विश्वनाथ वाघारे (वय 50 रा. नवभारत चौक, ग.नं.6, धुळे) व किशोर मधुकर थोरात (वय 47 रा. मनमाडजीन, धुळे) अशी दोघा मृतांची नावे आहेत. दोघेही श्रावणमासानिमित्त दर शनिवारी पहाटे आर्वी येथील रोकडोबा हनुमानाला पायी जात होते. आज तिसर्या शनिवारी दोघे मित्र पहाटे साडेपाच वाजता रोकडोबाला जाण्यासाठी घरून पायी निघाले. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अवधान शिवारातील वासवा टायर्सजवळील आयसीआयसीआय बँकेसमोरून त्यांना मागावुन भरधाव वेगात येणार्या ट्रकने चिरडले. राजु वाघारे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ते जागीच
ठार झाले. तर किशोर थोरात यांच्या पाठीवरून तसेच डाव्या हातावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. टोल नाक्यावरील रूग्णवाहिकेने दोघांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून राजु वाघारे यांना मृत घोषित केले. तर किशोर थोरात यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा सकाळी 9 वाजता मृत्यू झाला. यावेळी दोघांच्या नातेवाईकांसह मित्र मंडळीने रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.
याबाबत कैलास भटू वाघारे यांनी मोहाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नाकाबंदी करीत ट्रकला पकडले-
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रकला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यासह महामार्ग पोलिसांना सुचीत केले. ट्रकला (क्र.एम.पी.09/ए.एच.9361) मालेगाव येथील महामार्ग पोलिसांच्या मदत केंद्राजवळ पकडण्यात आले. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दोघांची एकत्र अंत्ययात्रा-
राजु वाघारे व किशोर थोरात हेे दोघेही चांगले मित्र होते. वाघारे हे नगरपालिकेत वसुली विभागात नोकरीला होते. दोघे नेहमीच सोबत असायचे. मात्र दोघांचा अपघातात मृत्यू झाला. सायंकाळी दोघांचीही सोबतच अंत्ययात्रा काढण्यात आली. श्री एकविरा देवी मंदिरामागली अमरधाममध्ये दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर देखील हजर होते.
0 Comments