स्वप्नाली सावंत यांना दोन मुले असून ब्युटी पार्लर आणि कपड्याचे दुकान आहे. 1 सप्टेंबर रोजी त्या दुकानात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. परंतु त्या घरी परतल्या नाहीत म्हणून त्यांचा पती सुकांत याने 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. याप्रकरणी तपास करताना सुकांत आणि स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासूनचे वाद अजूनही असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
तसेच गेल्यावर्षी सुकांतने स्वप्नाली यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तो तिला वारंवार ठार मारण्याची धमकी देत असे. त्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या आदेशाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध पोलिस अधिकारी व अंमलदारांची पथके नेमून अनेक दिशेने तपास केला. तेव्हा पोलिसांना तक्रारदार पती सुकांतने पत्नी स्वप्नाली हरविल्याची तक्रार दिली असून या घटनेपेक्षा वेगळी घटना घडली असल्याचा संशय आला. तपास करण्यासाठी गेले तीन दिवस पोलिसांचे पथक मिऱ्या येथे जाउन श्वान पथकाच्या सहाय्याने तपास करत होते. परंतु पोलिसांना ठोस निष्कर्ष घेण्यासाठी पुरेसा पुरावा आवश्यक होता.
पोलिस पुरावा शोधत असताना 11 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांची आई संगिता कृष्णा शिर्के (64, रा. तरवळ, जाकादेवी रत्नागिरी) यांनी तक्रार दिली. त्यानूसार, 1 सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी स्वप्नाली सावंत ही त्यांच्या आईकडे तरवळला येणार होती. परंतु ती आली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. स्वप्नालीची आई आणि त्यांच्या अन्य मुली मिऱ्या येथील स्वप्नालीच्या घरी गेल्या होत्या.
त्यावेळी तिचा पती सुकांत घरी होता. या सर्वांमध्ये मोठा वाद झाला. तेव्हा सुकांत सावंतने मी आणि माझ्या अन्य दोन साथीदारांनी मिळून 1 सप्टेंबर रोजी स्वप्नालीचा गळा आवळून ठार मारले असून तिला घराच्या आवारातच जाळून त्याची राख समुद्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग आणि अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत. तसेच या तपासात शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रविण स्वामी आदी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.
0 Comments