मुलगा आणि पत्नीसह ४५ वर्षीय शेतकरी शेतात गेला; काम करत असतानाच बाप-लेकावर अचानक काळाचा घाला

जळगाव : शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत एक महिला सुदैवाने बचावली आहे. चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शिवारात ही घटना घडली आहे. आबा शिवाजी चव्हाण (वय-४५) असं मृत वडिलांचं आणि दीपक आबा चव्हाण (वय-१४) असं मृत मुलाचं नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. या कपाशीला खत देण्यासाठी आबा चव्हाण हे पत्नी आणि मुलासह शेतात गेले होते. यादरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तिघे जण शेतातील शेवग्याच्या झाडाखाली उभे असताना या झाडावर अचानक वीज कोसळली.
घटनेत आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी या घटनेत थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे.


दरम्यान, या दुर्घटनेनं चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आबा चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावावर शोककळा पसरली आहे.

नागरिकांनीच शेतात पडलेले मृतदेह उचलून खांद्यावरून नेले

घटना कळल्यानंतर तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण घटनास्थळी पोहोचले. मात्र तब्बल तीन तास उलटूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच शेतात पडलेले मृतदेह खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेले. पोलीस प्रशासन वेळेत न पोहोचल्याने नातेवाईकांनी यावेळी रोष व्यक्त केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी मृतांच्या वारसांना मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e