९ सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कारखान्यातून सोनवणे बेपत्ता झाले. ग्राहक बनून आलेल्या तिघांसोबत एका कारमध्ये ते बसले. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सायंकाळी मालेगावातील सायतरपाडे कालव्यात त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मालेगावात दाखल खुनाचा गुन्हा १२ सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलिसांत वर्ग झाला. या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड पोलिसांसह गुन्हे शाखेची सर्व पथके करीत आहेत. नाशिक जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील ‘सीसीटीव्हीं’द्वारे सोनवणेंच्या अपहरणावेळी वापरलेल्या कारचा माग काढण्यात आला. मात्र, पोलिसांना त्यात फार काही मिळाले नाही. दरम्यान, सोनवणे बेपत्ता झाले तेव्हा त्यांच्या मोबाइलचा वापर करून इतर सिमकार्डद्वारे काही मेसेज केल्याचे समजते. हे सिम संशयितांनी नाशिकरोडच्या एका दुकानातून घेतले. तिथल्या ‘सीसीटीव्ही’त संशयास्पद हालचाली व त्यांचे फोटो चित्रीत झाले आहेत. त्यानुसार पोलिस मोबाइल शोधून संशयितांचा माग काढत आहेत. दरम्यान, संशयितांनी नियोजनबद्धरित्या हा गुन्हा केल्याचे दिसते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा ठेवली असून, लवकरच मारेकरी ताब्यात येण्याची शक्यता आहे.
0 Comments