धुळे येथे एसटी कर्मचारी जिवंतपणीच भोगतायत नरकयातना; पाहा, आरामाच्या ठिकाणचे भयानक वास्तव

धुळे : प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या  विविध समस्या आपण नेहमीच पाहतो. मात्र, याच एसटी कर्मचाऱ्यांसाठी धुळे आगारात उभारण्यात आलेल्या विश्रांतीच्या निवासस्थानाचे भीषण वास्तव आम्ही तुम्हाला आत्ता दाखवणार आहोत, एसटी कर्मचारी जिवंतपणीच नरकयातना भोगतायेत असे येथील परिस्थिती पाहून म्हणता येईल. त्याला कारणही तसेच आहे 
धुळे आगारातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेस्ट रूमची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलंय. तर, या ठिकाणी मुक्कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट जमिनीवरच झोपावं लागतंय. यांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात असलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर, याच आवारात काही मद्याच्या बाटल्या देखील पडल्या आहेत. स्नानगृहामधून बाहेर पडणारे पाणी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचून डासांचा गेल्या काही दिवसांपासून उपद्रव वाढला आहे. टॉयलेटची देखील अशीच दुरावस्था असून स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव या ठिकाणी दिसून येतो.
लांबचा प्रवास करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी साध्या बेडची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही. बाहेरगावाहून मुक्कामासाठी थांबलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेस्ट रूमची वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरून कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १२ ते १४ तास काम करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीची नितांत गरज असते. मात्र, ज्या ठिकाणी सामान्य माणूस काही वेळ बसू शकत नाही अशा परिस्थितीत विश्रांती घ्यायची तरी कशी.?, असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर उभा राहतो.

प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, ज्या चालक आणि वाहकांच्या जीवावर तुमचा आणि आमचा प्रवास सुखरूप होतो, त्याच कर्मचाऱ्यांना मात्र उत्तम सोयीसुविधा मिळत नाहीत. या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना किमान मुबलक सोयी सुविधा तरी द्या, एवढीच माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होते आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e