खडकी पाडाचे वास्तव
नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणाहून तोरणमाळपर्यंत खडतर डोंगरदर्याचा रस्ता जवळपास शंभर पेक्षा अधिक किलोमीटर पार करून पुन्हा 38 किलोमीटरची दरी उतरून पहिले गाव लागते ते खडकी. हे गाव जवळपास बारा पाडे मिळून एका गावाचा दर्जा दिला गेला आहे. या गावातील काही पाडे आठ किलोमीटर लांबपर्यंत दरीमध्ये वास्तव्यास आहे. खडकी येथील शाळेत एक ते पाच वर्ग भरतात. जवळच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. खडकी येथील विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी एक ते दोन दिवसाआड मास्तर येत असल्याचे वास्तव सांगितले. तर खडकी येथील शाळेत एकूण पाच शिक्षकांची नियुक्ती आहे. त्यापैकी एक गुरुजी हजर होते. तर इतर शिक्षक धडगाव येथे मतदानाच्या ट्रेनिंगला गेले असल्याची माहिती देत या ठिकाणी असलेल्या समस्यांचा पाढा वाचला.
मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून अगदी काही अंतरावर असलेल्या झापी, फलई, सावर्या, या पाड्यांवर शिक्षणाची हीच अवस्था आहे. झापी येथील शाळेचे द्वार 24 तास उघडे राहत असल्याचे चित्र आहे. दुपारचे एक वाजले होते तरी या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षक कधी येतील हे पाहण्यासाठी शाळेने आपले द्वार उघडून वाट बघितली असावी असे वाटते.
झेंडा फडकावयलाच येतात मास्तर
फलाई गावात तर साम टीव्हीची टीम जाण्याअगोदर एक दिवस मास्तर येऊन गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. शाळा नादुरुस्त अवस्थेत आहे; त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी आहे, मात्र शाळाच भरत नाही अशी अवस्था आहे. गुरुजी केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याच दिवशी येतात. झेंडा फडकवल्यानंतर काही काळात खाली उतरवून पुन्हा चालले जातात अशी धक्कादायक माहिती गावकऱ्यांकडून ऐकायला मिळाली. वर्षभरापासून शाळेचे पत्रे उडाले आहे. याबाबत दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी शिक्षकाकडे मागणी केली मात्र शिक्षकांनी उलट त्यांना गावातील नागरिकांकडून वर्गणी करून शाळेची दुरुस्ती करा असा सल्ला दिला. फलाई गावातील शाळेची विशेषता म्हणजे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या भागात रस्ता नव्हता; तेव्हा मात्र मास्तर येत होते. पण आता डांबरीकरणाचा रस्ता झाला आहे, तरी मास्तर येत नसल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
16 शाळा समाविष्ट परंतु..
तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये आतापर्यंत जवळपास 16 शाळा समाविष्ट करण्यात आल्या आहे, परंतु पर्याप्त शिक्षक वर्ग उपलब्ध नाही. आणखी 18 पदवीधर शिक्षकांची गरज आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या शाळेचा आढावा घेऊन लवकरच आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील; अशी माहिती एका पत्रकार परिषदेतून दिली होती. तर उर्वरित 14 शाळा अद्यापही समायोजन सेवेत बाकी आहेत. त्या ठिकाणी पाड्यावर शिक्षक वर्ग जात नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून यावर आता शिक्षण विभाग काय कारवाई करतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
0 Comments