याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कोळी पेठेतील आकाश सपकाळे हा त्याचा भाऊ सागर सपकाळे व मित्र सागर आनंदा सपकाळे यांच्यासह जुने बसस्थानक परिसरात आले होते. याठिकाणी संशयित गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे यांच्यासह तीन ते चार तरुण याठिकाणी आले. त्या दोघ गटांमध्ये तीन महिन्यांपुर्वी झालेल्या भांडणावरुन त्यांच्यात वाद झाला.
या वादातून गोपाल सैंदाणे याच्यासह त्याच्या साथीदारांनी आकाश व त्याचा भाऊ सागर सपकाळे आणि सागर आनंद सपकाळे यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याने आकाश उर्फ धडकन याचा जागीच मृत्यू झाला. जखमी दोन्ही तरुणांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. दोन्ही तरुणांच्या पाठीसह कमरेवर चाकूने वार केल्यामुळे प्रचंड रक्तस्राव होत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रमंडळींनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती.
क्लबमध्ये झालेल्या वादातून हल्ला?
शहरातील जूने बसस्थानक परिसरात पत्त्यांचा क्लब असून याठिकाणी मयत आकाश उर्फ धडकन व संशयित गोपाल उर्फ अण्णा सैंदाणे यांच्यात वाद झाले. वाद इतका विकोपाला गेली की या वादातून आकाश याच्यासह त्याच्या साथीदारांवर वार झाल्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरु होती. मात्र त्याला पोलिसांकडू दुजोरा दिला जात नव्हता.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी
खुनाची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश देशमुख यांच्यासह जिल्हापेठ, शहर आणि एलसीबीच्या कर्मचार्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर जखमींकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कुटुंबीयांचा आक्रोश...
आकाश याचा खून झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. तसेच जखमी सागर सुरेश सपकाळे याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
संशयित पोलीस ठाण्यात हजर
संशयित गोपाल उर्फ आण्णा कैलास सेैंदाणे याने आकाश उर्फ धडकन याच्यावर वार केल्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. तर त्याचे साथीदारांनी घटनास्थळाहून पसार झाले. त्यांच्या शोधार्थ एलसीबीसह शहर पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले होते.
0 Comments