लाच प्रकरणी या पोलिस उपनिरीक्षकावर जालना येथील कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून ही कारवाई जालना येथे एसीबीच्या पथकाने आज (ता. 12) केली.
छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश शेषेराव शिंदे (वय 35 वर्ष) असे कारवाई झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते कदीम जालना पोलीस स्टेशन (जिल्हा जालना) येथे पोलीस उपनिरीक्षक (वर्ग 2) पदावर कार्यरत आहेत.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. यानंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई 110 ऐवजी 107 नुसार करण्यासाठी अर्थात गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीअंती घेतले 75 हजार
एक लाखांची मागितल्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेची पडताळणी केली. या दरम्यान तडजोडीअंती गणेश शिंदे यांनी 75 हजार रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारले.
संशयाची पाल चुकचुकली!
लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर गणेश शिंदे यांना एसीबीच्या सापळा पथकाचा संशय आला. यानंतर लाचेच्या रकमेसह त्यांनी सापळा पथकास ताब्यात घेण्यास अडथळा निर्माण करून स्वतःच्या खाजगी वाहनाने पळ काढला होता.
पाठलाग करुन पकडले, सापडले घबाड!
सापळा पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून गणेश शिंदे यांना पकडले. तत्पूर्वी त्यांनी लाचेची रक्कम पाठलागादरम्यान फेकून देत पुरावा नष्ट केला. यानंतर सापळा पथकाने पंचासमक्ष त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये आणि 25 तोळे (250 ग्रॅम) सोने आढळून आले आहे. या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधिक्षक विशाल खांबे, उपअधिक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस अमलदार नागरगोजे, काळे यांनी केली.
0 Comments