पोलिस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेलच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने तत्काळ वालंबा काठी येथे जाऊन तेथे पोलिस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्य ग्रामसेवक, पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडीसेविका, आशास्वयंसेविका यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली. संबंधित अल्पवयीन मुलीची माहिती घेतली असता ती १४ वर्षे दोन महिने वयाची होती व तिचा विवाह गुजरातमधील तापी जिल्ह्याच्या देवरुखली गावातील युवकासोबत निश्चित करण्यात आला होता; परंतु त्यापूर्वीच पोलिस अधीक्षक कार्यालयातील अक्षता सेल व मोलगी पोलिस ठाणे स्तरावर सुरू करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई-वडील व इतर नातेवाइकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलींना होणारा त्रास, तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच मोलगी पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस अल्पवयीन मुलीच्या पालकांना देण्यात आली. पालकांनी मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे, अक्षता सेलच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नयना देवरे, पोलिस अंमलदार अभिमन्यू गावित, दीपक न्हावी, अरुणा मावची, वालंबा काठी गावाचे सामाजिक कार्यकर्ते धीरसिंग पाडवी, ग्रामसेवक शांतिलाल बावा, अंगणवाडीसेविका शिवाजीबाई पाडवी यांनी केली."पालकांनी मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाइकांना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहाबाबत अक्षता समितीचे सदस्य पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंणवाडीसेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचित करावे." -पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार
0 Comments