नंदुरबार जिल्हयात पुन्हा अवकाळीचा कहर

नंदुरबार जिल्हयात आज दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान ठिकठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांची पडझड  झाली असून झाडे उन्मळून पडली. तळोदा परिसरात आंबा तसेच ज्वारी, बाजरी, मूग पिकांचे नुकसान झाले असून तळोदा तालुक्यातील रापापूर येथील नदीला पूर आला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी रणरणते ऊन तर कधी ढगाळ वातावरण. दरम्यान, आज दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान जिल्हाभरात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून वृक्ष व वीज तारा उन्मळून पडल्या आहेत. पावसामुळे वातावरणामध्येही गारवा निर्माण झाला आहे
तळोदा । ता.प्र.- तळोदा तालुक्यात झालेल्या वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे आंबा तसेच ज्वारी, बाजरी, मूग पिकांचे नुकसान झाले आहे.

तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याजवळील रापापूर, चौगाव, गढीकोठडा, कोठार रोझवा, रोझवा पुनर्वसन, तलावडी रामपूर सतोना, मोदलपाडा, सोमावलसह परिसरात जोरदार वेगवान वार्‍यांसह पावसामुळे आंबे बागांचे, केळी, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोवळ्या कैर्‍या उन्मळून पडल्या तसेच ज्वारी, बाजरी, मूग यासारख्या पिकांनाही वादळी वार्‍याचा मोठा फटका बसला असून तेही काही प्रमाणात आडवे झाल्याचे चित्र आहे. परिसरात वादळी वार्‍यांमुळे वृक्षही कोलमडले असल्याचे चित्र आहे. काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून घरांच्या झालेला नुकसानीचा पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काही गावालगत वीटाभट्टींचेही नुकसान तलावडी, रोझवा परिसरातील वीटभट्टीवर कच्च्या विटा मोठ्या प्रमाणावर तयार होत्या, वेगवान वारे आणि पावसामुळे कच्च्या विटांचे मोठे नुकसान झाल्यामुळे वीटभट्टीधारकांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. रोझवा पुनर्वसन येथील होमा दोहर्‍या पाडवी यांच्या घरावर वार्‍यामुळे कोलमडलेले झाड कोलमडून घराचे नुकसान झाले आहे.
बोरद येथे मेघगर्जनेसह पाऊस

बोरद । वार्ताहर- बोरद परिसरात आज दुपारी 12.30 ते 02.30 च्या सुमारास मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. आज सकाळपासूनच बोरद परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. या वातावरणात हळूहळू बदल होत दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मेघर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या कालावधीत वीजांचा कडकडातही मोठ्या प्रमाणात होता. पावसासोबत जोरदार वाराही होता. हा पाऊस सुमारे दोन तास या परिसरामध्ये बरसत राहिला. पाऊस मध्यम स्वरूपाच्या असल्याने व काहीसा वारा तसेच विजांचा कडकडाट यामुळे जणू काही पावसाचे दिवस आहेत असेच या ठिकाणी भासत होते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र तीव्रतेने नागरिक बेजार झालेले होते. आज अचानक हा पाऊस बरसल्याने परिसरात गारवा निर्माण झालेला आहे. परंतु शेतामध्ये काही शेतकर्‍यांचे हरभरे कापून त्या ठिकाणी गंजीच्या स्वरूपात ठेवलेले होते. काही शेतकरी हरभरे काढण्याच्या तयारीत होते. काहींचे गहू शेतात उभे होते. परंतू काही प्रमाणात गहू शेतात उभा असल्याने हरभरा तसेच गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अक्कलकुवा

अक्कलकुवा । श.प्र.- अक्कलकुवा तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

मात्र काही वेळात अचानक जोरदार वादळी वार्‍यासह विजांचा कडक़डाट करीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गाराही पडल्या. अनेकांची घरावरची तारपत्री, पाण्याच्या टाकीचे झाकण उडले. या अवकाळी पाऊसामुळे शेती पिकांना फटका बसणार आहे. यामुळे शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

धानोरा

धानोरा । वार्ताहर - धानोरा ता.नंदुरबार येथे आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यावर्षी अवकाळी पावसाने कहरच केला आहे. या पावसामुळे गहु, मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहेच. आता तीळ या पिकाचेही अवकाळी पावसामुळे नुकसान होणार आहे. तीळ व एरंडी ही पिके परीपक्व अवस्थेत आली असून शेतकर्‍यांची पिकाची कापणीची लगभग सुरु होण्याआगोदरच पाऊस झाला. त्याचबरोबर लग्नसराईतही अवकाळी पावसाची चिंता निर्माण झाली आहे. बारमाही पावसामुळे चांगलीच पंचाईत होत आहे. संध्याकाळी 5.30 वाजता वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ व वर्‍हाडींमध्ये नाराजीचा सूर पाहवयास मिळाला

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e