नाशिक शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडल्यामुळे शहर हादरले आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड दुर्गा मंदिरासमोर एका इसमाचा धारदार शस्त्राने आणि काचेने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर (वय ४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, नाशिक) हे पूर्वी मुंबई येथे राहत होते. कौटुंबिक वादामुळे १५ ते २० दिवसांपूर्वी जेलरोड येथे एकटेच राहत होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांच्या एका मुलाने याच कारणाने मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे.
प्रवीण दिवेकर हे घरी एकटेच राहत असल्याने त्यांचे आई-वडील त्यांना भेटण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांना प्रवीण दिवेकर हे घरातील जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना त्यांनी विचारपूस केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दिवेकर यांच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकले नसून, दिवेकर यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर देखील फरार झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
0 Comments