पोलिसांना एका घटनेच्या तपासादरम्यान चक्क आईने आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन विक्षिप्त वागणाऱ्या मुलाच्या हत्येची सुपारी देवून खून केल्याची घटना उघडकीस आली. योगेश विजय देशमुख (२८) रा. नेरपिंगळाई, ता. मोर्शी, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. रविवारी उजेडात आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे
योगेश २० एप्रिल रोजी नेरपिंगळाई येथून आपल्या आईसोबत यवतमाळ येथे आपल्या मावशीकडे आला. योगेश विक्षिप्त स्वभावाचा होता. तो आईला पैशांसाठी त्रास द्यायचा, असे सांगितले जाते. दरम्यान, यवतमाळ येथील त्याचे मावसे मनोहर चौधरी, रा. देवीनगर लोहारा येथे त्याच्या आईने योगेशच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पुढे आली आहे. योगेशच्या आईने आपली बहीण उषा व तिचा मुलगा लखन चौधरी यांना योगेशच्या विक्षिप्त वागण्याची माहिती दिली. या सर्वांनी पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असलेल्या विक्की भगत व राहुल पडाले यांना योगेशच्या खुनाची सुपारी दिली. पाच लाख रुपयांत कट रचला गेला. दोघांनाही दोन हजार रुपये ॲडव्हान्स दिला गेला.
या दोघांनी योगेशला यवतमाळ लगतच्या चौसाळा जंगलात नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मरत नसल्याचे बघून त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला ठार केले. दरम्यान, आरोपी विक्की भगत यानेच ‘डायल-११२’ वर फोन करून चौसाळा जंगलात अनोळखी पुरुषाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली
लोहारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी माहिती देणाऱ्यावरच पोलिसांना संशय आल्याने विक्की भगत याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यानेच आपण सुपारी घेऊन योगेशचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी प्रफुल्ल उत्तम वानखडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपी विक्की भगत, राहुल पडाले, मृताची आई वंदन विजय देशमुख यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सहाही आरोपींना अटक केली.
0 Comments