“मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो म्हणून…”, चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात ७ खाती दिली होती. तरी ते म्हणत असतील भाजपात काही मिळालं नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना काय मिळालं? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पार्टीत ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले, निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादीला ओबीसी समाजाची आठवण आली. भाजपाने मोदी यांना पंतप्रधान करून ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. केंद्रात ओबीसी समाजाचे २७ मंत्री आहेत. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या काळातच ओबीसींचे मंत्रालय स्थापन झाले. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात समाजाला न्याय मिळू शकला नाही या कारणावरून तत्कालीन ओबीसी आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
बावनकुळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दलही वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात ७ खाती दिली होती. तरी ते म्हणत असतील भाजपात काही मिळालं नाही, तर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना काय मिळालं?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. खडसे म्हणाले, मंत्रिमंडळात मला सात खाती नव्हे तर १२ खाती दिली गेली होती. मुळात ती देणं त्यांना परिस्थितीनुसार भाग होतं. कारण तेव्हा मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. मुख्यमंत्रीपदासाठी मी उठाव करू नये म्हणून मला १२ किंवा १५ खाती घ्या असं सांगितलं होतं. मला सांगितलं होतं तुम्हाला हवं ते घ्या आणि मंत्रिमंडळात या. तसेच ही खाती मला फडणवीस यांनी दिली नव्हती तर, परिस्थितीनुसार ती देणं त्यांना भाग पडलं होतं.
खडसे यांनी भाजपात परतावं : तावडे
एककनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पुन्हा भाजपमध्ये यावे, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रविवारी केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. तावडे म्हणाले, खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असायला हवा. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी माझं बोलणे झालेलं नाही किंवा त्यांना तसा प्रस्ताव दिलेला नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e