कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग इथे ५ हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या संशयित महिला तलाठ्याकडे अँटी करप्शन विभागाच्या चौकशीत मोठ्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच ४ जुलै रोजी अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बामणोली महसूली सजाच्या प्रभारी तलाठी पल्लवी भोईर यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता, दोन फ्लॅट सहित जमीन, वाहने सापडली असून त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.
पल्लवी भोईर यांनी जमवलेल्या लाखोंच्या मायेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता अलिबाग तालुक्यातील चेवळे नगर येथे टू बीएचके सदनिका, अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली येथे दीड गुंठे शेतजमीन, सुधागड तालुक्यातील पाली येथे दोन बीएचके सदनिका, मारुती वॅगनर कार, होंडा शाईन मोटारसायकल, होंडा अविएटर मोपेड बाईक सापडली आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये २ लाख २४ हजार रुपये किंमतीच्या फर्निचर व इतर गृहउपयोगी वस्तू आढळून आल्या आहेत.
0 Comments