धुळे: शहरातील पारोळारोड येथील चौफुली जवळील हॉटेल पंकजच्या शेजारी आज सकाळच्या सुमारास अंदाजे १५ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. कोणीतरी नायलॉन पिशवीत या अर्भकाला येथे टाकून गेले होते. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनीही तातडीने दाखल घेत सदर अर्भकास उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, हे अर्भक कोणी व का टाकले, याचा शोध तालुका पोलिस घेत आहे.
सुरत-नागपूर महामार्गावरील हॉटेल पंकजच्या शेजारी कोणीतरी एक स्त्री जातीचे अर्भक पिशवीत टाकून गेले. सुदैवाने त्याठिकाणी श्वान वैगरे नव्हते. यावेळी महामर्गावरुन जाणाऱ्या लोकांना अर्भकाची हालचाल जाणवली आणि रडण्याचाही आवाज येत होता. त्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे नागरिकांनी पोलिस मदत केंद्राच्या डायल ११२ या क्रमांकावर सदर माहिती कळवली. त्यानंतर आझाद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संतोष घुगे, पोकों हरीश गोरे, पोका रमेश माळी, चंद्रकांत पाटील लागलीच घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी तत्काळ गर्दी बाजूला केली. पोलिसांना त्या ठिकाणी स्त्री जातीचे जिवंत अर्भक दिसून आले. सदर अर्भकास उपचाराची आवश्यकता असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ गर्दीतील महिलेच्या मदतीने सदर अर्भकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. दरम्यान, घटनास्थळ हे धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तालुका पोलिसांना माहिती देत पाचारण करून त्यांच्याच उपस्थितीत बालकास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यामुळे उपस्थित नागरिकांनी आझाद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मांगीलाल सरग यांनीही मदतीसाठी धाव घेतली होती.
0 Comments