शहरातील एसआरपीएफच्या मैदानावर शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. दुपारी दीड वाजेची कार्यक्रमाची वेळ होती. मात्र खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे त्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन आणि माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. तसेच मानधन योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या कलावंतांना देखील प्रमाणत्राचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी पावणे पाच वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
कार्यक्रमाच्या व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, जयंत पाटील, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावीत, माजीमंत्री आ. जयकुमार रावल, आ.काशिराम पावरा, आ.मंगेश चव्हाण, आ.किशोर दराडे, आ.फारूक शाह, जि.प.च्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जे.शेखर/पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम राम मंडळी, जय खान्देश म्हणत, अहिराणीत भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, शासन आपल्या दारी हा आगळा-वेगळा उपक्रम सरकारने सुरू केला आहे. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी यायच्या, म्हणून शासनाने शासन आपल्या दारी नेण्याची संकल्पना आणली. या उपक्रमामुळे नागरिकांचे हेलपाटे वाचले आहेत. या अभियानामुळे गरजु लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जात आहे. अनेकांना योजनांची माहिती मिळत नसल्यामुळे सरकारच्या अनेक योजनांना लाभ घेता येत नव्हता. मात्र शासन आपल्या दारी या अभियानामुळे सहज लाभ मिळत आहे. श्रम, वेळ व पैशांची बचत होत आहे. या कार्यक्रमात एकाच छताखाली 75 हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याचेही ते म्हणाले.
0 Comments