भावाच्या आजारपणाचा फायदा घेत बहिणीने लाटले 35 लाखदोघांच्या मदतीने खात्यातून काढले पैसे || कोतवाली पोलिसांत गुन्हा

भावाला सेवानिवृत्तीनंतर मिळालेली 35 लाखांपेक्षा जास्त रक्कम बहिणीने दोघांच्या मदतीने बँकेतून परस्पर काढून घेत विश्वासघात केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वैष्णवी सिध्देश्वर चाबुकस्वार (वय 18 रा. ख्रिस्तगल्ली, कापडबाजार) हिने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आत्यासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा लक्ष्मीकांत चाबुकस्वार (रा. ख्रिस्तगल्ली, कापडबाजार), देवीदास नारायण गोटे व जयराम देविदास गोटे (दोघे रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी वैष्णवीचे वडिल सिध्देश्वर लक्ष्मीकांत चाबुकस्वार हे युनाटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होते. दरम्यान, ते आजारी असल्याने त्यांनी सन 2018 मध्येच सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांना गंभीर आजार असल्याने ते एकाच जागी बसून आहेत. त्यांच्या बँक खात्याचा व्यवहार त्यांची बहिण शारदा पाहत असून एटीएम कार्ड, बँकेचे पासबुक व चेकबुक सर्व तिच्याकडेच आहे. तिने देविदास व जयराम गोटे यांच्या मदतीने सिध्देश्वर चाबुकस्वार यांच्या बँक खात्यातील 35 लाखांपेक्षा जास्त रक्कम खात्यातून परस्पर काढून घेत विश्वासघात केला असल्याचे वैष्णवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
वैष्णवी यांनी वडिलाच्या बँक खात्याचे स्टेटमेंट काढल्यानंतर सदरचे पैसे चेक व एटीएम कार्ड व्दारे काढल्याचे दिसून आले. त्यानंतर वैष्णवी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e