शहर पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने ही कामगिरी बजावली. विशाल रणजितसिंह चौधरी (रा. पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर) यांची होंडा शाइन दुचाकी (एमएच १८, बीटी ५६३७) ७ ऑगस्टला रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या सुमारास करवंद रस्त्यावरील गौरव हॉटेलसमोरून चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स येथे एक संशयित कमी किमतीत दुचाकी विकत असल्याची माहिती मिळाली. शोधपथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे होंडा शाइन दुचाकी आढळली. संशयित विनोद अशोक कोळी (वय २८, रा. कोठली, ता. शहादा) याला कसून विचारणा केली असता त्याने होंडा शाइन दुचाकी कुकावल (ता. शहादा) येथून चोरल्याची कबुली दिली. शहादा पोलिसांकडे केलेल्या चौकशीत चोरी उघड झाली. त्यामुळे संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत असताना विचारपूस केल्यानंतर त्याने शिरपूरसह आणखी काही ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे कबूल केले
संशयिताने दिलेल्या माहितीवरून कोठली येथील त्याच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर आणखी चार दुचाकी आढळल्या. त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यात होंडा शाइन ब्रँडच्या तीन, एक होंडा ड्रीम युगा व एक हीरो स्प्लेंडरचा समावेश आहे. या तपासात शहादा, शिरपूर व चोपडा शहर पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दोन लाख ७० हजार रुपये आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, आरिफ तडवी, मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.
0 Comments