पिंपरी: लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीच्या जामिनासाठी अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्याच त्याला १८ वर्षे पूर्ण होणार आहेत
शालूबाई रुपा साळवी (वय ८५, रा. भाजीमंडई जवळ, पिंपरी) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता भिमराव कांबळे (वय ४८, रा. चंद्ररंग पार्क, पिंपळेगुरव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी दिली. साळवी या घरात एकट्याच राहत होत्या. आरोपी ३१ जुलै रोजी सिमेंटचा पत्रा उचकटून घरात घुसला. त्याने महिलेचा खून करून अंगावरील, घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल फोन, गॅस सिलेंडर असा एक लाख ४ हजार ५०० रुपयांचा माल चोरुन नेला. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली. त्या भागातील जबरी चोरी करणारे गुन्हेगार, अल्पवयीन गुन्हेगारांची माहिती घेतली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी हा घटना घडल्यापासून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अल्पवयीन आरोपी पिंपरी भाजी मंडईच्या आवारात लपत-छपत फिरत असल्याचे दिसून आले. पोलीस दिसताच तो पळून जावू लागला. त्याला पाठलाग करुन सोमवारी पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे
अल्पवयीन आरोपी हा मैत्रिणीसोबत राहत होता. त्याची मैत्रीण एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. तिला जामीन मिळण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन खून केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून दागिने, मोबाइल फोन, सिलेंडर असा ३० हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीला उद्या १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याच्यावर पिंपरी ठाण्यात नऊ, येरवडा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
0 Comments