कुसुंबा रस्त्यावरील 70 अतिक्रमणे हटविली; वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टळणार

शहरातील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीचा व प्रमुख रस्ता असलेल्या कुसुंबा रस्त्यावरील लहानमोठी सत्तरहून अधिक अतिक्रमणे मंगळवारी (ता.१२) महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटविली. यात विविध व्यापारी संकुलांसमोरील पक्के अतिक्रमण, शेड यांचाही समावेश होता. गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढणे आवश्यक झाल्याने अतिक्रमण हटविल्याचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी सांगितले. 
श्री. गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त जनार्दन पवार यांच्या आदेशाने महानगरपालिका प्रभाग २ च्या कार्यालयाने पुढाकार घेत कुसुंबा रस्त्यावरील नविन बसस्थानक ते करीम नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रस्ता व नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सातत्याने या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करत होते. यापूर्वीही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. ही मोहीम रस्ता कामासाठी जुजबी स्वरूपात झाल्याची टीका त्यावेळी करण्यात आली होती.अतिक्रमण निर्मूलन विभागाची आज दोन वाहने, जेसीबी व २० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कुसुंबा रोड व नाल्यावरील ७० कच्च्या- पक्क्या स्वरुपाचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक दुकानदार व हॉटेल मालकांनी पक्क्या दुकानांच्या पुढे अतिक्रमण करून बांधलेले पत्रे व लोखंडी ॲंगलचे शेडही तोडण्यात आले. अतिक्रमण मोहीम सुरु होताच काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. अतिक्रमण हटविल्यामुळे कुसुंबा रस्त्यावरील रहदारीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. अतिक्रमणाबरोबरच या भागात रस्त्यावर फिरणारे खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. येथे प्रामुख्याने बसस्थानक परिसर, निहालनगर चौकी, करीमनाका येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती.सहाय्यक आयुक्त हरीश डिंबर, प्रभाग अधिकारी फय्याज अहमद अब्दुल लतीफ, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण पथक प्रमुख समाधान गायकवाड, बिट निरिक्षक शुभम बहुतकर, बिट मुकादम संजय जगताप, कुणाल खैरनार, रफिक शहा, शिवाजी राठोड, मोहनिश परदेशी, तुषार चौधरी, दिलीप निकम, सचिन निकम आदींसह सहकाऱ्यांनी ही मोहीम राबविली
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी सक्त ताकीद अतिक्रमणधारकांना पथकाने दिली आहे.शहरातील उर्वरित प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.कॅम्प रस्त्यावर फांद्यांची छाटणीशहरातील कॅम्प रस्त्यावरील स्टेट बँक चौकात वळणावर असलेल्या दोन वृक्षांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. वीजवाहक तारा, गणेशोत्सव मिरवणुका आदींसाठीही आगामी काळात हे वृक्ष धोकादायक ठरण्याची शक्यता होती.महापालिका प्रशासनाने आज या वृक्षांचा विस्तार कमी करताना अडचणीच्या ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी केली. शहरातील वीजवाहक तारांना अडथळा ठरणारे सर्व वृक्षांच्या फांद्या गणेशोत्सवापूर्वी छाटाव्यात.लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा एमपीएसएल या खासगी कंपनीने ओढून घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e