वाळूमाफियाकडून महिला मंडळ अधिकार्‍यास धक्काबुक्की; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव: यावल तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकार्‍यांना गुरुवारी साकळी, शिरसाड परिसरात अवैध वाळू वाहतूक करीत असलेले पकडल्यानंतर परवान्याबाबत विचारणा करीत असताना वाळूमाफियाने दमदाटी व शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली आणि तेथून ट्रॅक्टर घेत फरार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वाळूमाफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावल तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकार्‍यांची ३१ ऑगस्ट रोजी साकळी, शिरसाड परिसरात वाळूसाठा देखरेखीसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेथे जात असताना रस्त्यात अवैध वाळू वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर दिसून आले. ट्रॅक्टरचालकाला थांबवीत वाळू वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती घेत असताना वाळूमाफियाने मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आणि तो ट्रॅक्टरसह पसार झाला.
साकळी मंडळात वाळूमाफियांकडून मंडळ अधिकार्‍यावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना घडल्याने महसूल कर्मचार्‍यांनी शासकीय काम कसे करावे, असा प्रश्‍न उपस्थित करून संपूर्ण महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात वाळूमाफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, यावल तालुक्यात सर्वाधिक साकळी आणि बामणोद मंडळात तापी नदीकिनारपट्टीवरून अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व उपसा केला जातो. या वाळूमाफियांना अभय कोणाकोणाचे आहे? याबाबत आता अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. वाळूमाफियांची हिंमत, दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतूक करणार्‍यांची नावे आणि वाहनांसह चौकशी करून यादी करून प्रांताधिकारी, यावलचे तहसीलदार, यावल पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e