औरंगाबाद : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा गावकऱ्यांना जेवढा उत्साह नसतो तेवढा गावच्या राजकारणात आणि ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे, ग्रामपंचायत निवडणुक असो की, सरपंच पदाची निवड असो अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना समोर येत असतात. एवढंच काय तर सरपंच पदाच्या निवडणुकीत चक्क ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी पाहायला मिळते. आता असाच काही प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात समोर आला आहे. वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ गावात चक्क एका पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचांचेच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याच्या कारणावरून हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी शिऊर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल रामकृष्ण चव्हाण (75 वर्षे, रा.पेंडेफळ, वैजापूर) असे अपहरण करण्यात आलेल्या उपसरपंचाचं नाव आहे.
0 Comments