तक्रारदार शिक्षक हा जिल्हा परिषदेच्या रामपुरा शाळेत (ता. शिरपूर) उपशिक्षक आहे. त्याची पेसा क्षेत्रातून नॉन पेसा क्षेत्रात बदली होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश पारित केला. याअनुषंगाने तक्रारदार शिक्षकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बदलीसाठी विनंती अर्ज सादर केला. त्यावर सीईओ यांनी “सहानभूतीपुर्वक विचार करावा'', असा शेरा मारत अर्ज पुढील कार्यवाहीस्तव शिक्षणाधिकारी साळुंखे यांच्याकडे पाठविला होता.तक्रारदार वेळोवेळी शिक्षणाधिकारी साळुंके यांची भेट घेऊन बदली अर्जावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करीत होता. यादरम्यान शिक्षणाधिकाऱ्याने तक्रारदारास त्याचा बदली अर्ज शिफारशीसह जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली.शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक विजय पाटील याने तक्रारदाराच्या बदली अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी सामान्य प्रशासन शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक महाले, पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ६६ हजाराची लाच मागितली. या छळामुळे त्रस्त शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली.
या पार्श्वभूमीवर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता शिक्षणाधिकारी साळुंखे याने २५ हजाराची लाच मागत तडजोडीअंती २० हजाराची मागणी करून वरिष्ठ सहायक विजय पाटील यास भेटण्यास सांगितले. पाटील याने सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक महाले व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ६६ हजाराची पंचांसमक्ष लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५१ हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य केले व पहिला हप्ता म्हणून ३५ हजार रुपये स्वीकारताना या संशयितांना पकडण्यात आले.त्यानुसार संशयित साळुंखे, पाटील याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला व त्यांना अटक झाली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर यांनी केली. त्यांना नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, वाचक अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments