सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी केलेल्या गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ओंकार तानाजी लोहकरे (वय १९, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याचा मित्र सागर ढेबे हे दोघे धायरी येथून दुचाकीवर जात होते. त्यावेळी दोघा अल्पवयीन मुलांनी त्यांचा दुचाकीवर पाठलाग केला.
धायरीतील खडक चौकात त्यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून ओंकारवर पाठीमागून दोन राउंड फायर केले. त्यात ओंकार गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ओंकार बाल सुधारगृहात असताना त्याचा अल्पवयीन मुलांशी वाद झाला होता. त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस संशयित आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत.
0 Comments