एकतर्फी प्रेमातून महिलेवर कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला. अरुणकुमार राजकुमार साहू (वय २२, रा.कल्याणीनगर, मूळ रा. सालेपूर, बिहार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०१६ कल्याणीनगरमधील एका सोसायटीत आरोपीने महिलेवर हल्ला केला होता. तक्रारदार महिला आणि आरोपी हे दोघेही एकाच सोसायटीत काम करत होते. तिथेच साहूची महिलेशी ओळख झाली. घटनेच्या दिवशी महिला काम संपवून घरी निघाली होत्या. तेव्हा साहू याने तिला अडवले व म्हणाला की, तुझा नवरा तुला नीट सांभाळत नाही. तू माझ्याशी लग्न कर. त्यावर महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला त्यामुळे साहू याने ‘तुला खल्लास करतो’ असे म्हणत महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील संतोषकुमार पताळे आणि ॲड. शुभांगी देशमुख यांनी पाहिले. पोलिस अधिकारी आर. बी. लोखंडे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर येरवडा पोलिस ठाण्याचे हवालदार मोहन गिरमे आणि विनोद कायगुडे यांनी तपासात मदत केली. दंडाची रक्कम महिलेला देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे
0 Comments