एवढेच नाही, तर श्री. खडसे हे राष्ट्रवादीकडून निकराने खिंड लढवित असून, थेट भाजपच्या नेत्यांवर टिका करीत आहेत. यामुळेच लोकसभा मतदारसंघातील खासदार रक्षा खडसे यांच्या भाजपतील उमदेवारीवर चर्चा सुरू झाली आहे.उमेदवारी नाकारणे चुकीचेखडसे राष्ट्रवादीत असल्यामुळे रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगितले जात असून, पक्ष त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याची तयारी करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. रक्षा खडसे यांच्या ‘खडसे’ या आडनावावरून पक्षात वरिष्ठ स्तरावरूनही उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे.तर पक्षाचे राज्यातील नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांनाच उमेदवारी मिळेल असे ठामपणे सांगितलेले नाही. पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, कदाचित उमेदवार बदलू शकतो असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत तळ्यात- मळ्यात सुरू असल्याचे चित्र दिसून आले. याबाबत सर्व चर्चाच सुरू होत्या. मात्र खासदार रक्षा खडसे यांनी त्याला वाचा फोडली.त्या म्हणाल्या केवळ ‘खडसे’ नाव असल्यामुळे आपली उमेदवारी डावलण्यात येत असेल, तर तो आपल्यावर अन्याय असणार आहे. आपले सासरे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले असले, तरी तो त्यांचा निर्णय आहे. मी मात्र भाजपचे कार्य करीत आहेत. पक्षाला तळागळापर्यंत नेण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे केवळ ‘खडसे’ आडनावावरून आपल्याला उमेदवारी नाकारणे चुकीचे ठरणार आहे.
मतदार संघातील कामाचे बळएकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर सीबीआय, ईडी, तसेच अनेक चौकशीची कारवाई झाली. परंतु रक्षा खडसे यांनी आपली कधीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. नेहमीच पक्षाची शिस्त पाळली; परंतु पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत विचार केल्यास त्या एकदम राजकारणात आल्या अन् खासदार झाल्या असे म्हणता येणार नाही.कोथळी येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथम त्यांनी भूषविले. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापतिपद त्यांनी भूषविले. पक्षाच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळाली.पहिल्या वेळेस त्यांच्या मागे सासरे एकनाथ खडसे यांची ताकद निश्चित होती. परंतु, पाच वर्षानंतर पुन्हा २०१९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यावेळी पाच वर्षात खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचेही बळ होते. त्याच बळावर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली अन् जनतेनेही त्यांना निवडून दिले हे नाकारता येणार नाही.भाजपसोबत ठामसासरे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपच्या खासदार म्हणून रक्षा खडसे यांची परीक्षाच होती; परंतु या काळात त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्ष म्हणून कुठेही त्यांनी विरोधी वक्तव्य केले नाही. पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या त्या सोबत राहिल्या. याच काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात भाजपच्या बैठका घेतल्या. जनतेशी संपर्क कायम ठेवला.
पक्षाच्या बैठकित उपस्थितीही दिली. त्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांनी व्यासपीठावर सासरे एकनाथ खडसे यांच्यावर टिका केली, परंतु त्यावर मत व्यक्त केले नाही. उलट पक्ष म्हणून आपण भाजपसोबत खंबीर आहोत, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे कुंटूबातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम त्यांनी कुठेही आपल्या पक्षीय, राजकीय जीवनात होवू दिला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षात तिसऱ्यांदा लोकसभा उमेदवारीचा दावा कायम ठेवला आहे. पक्षातील कार्य न पाहता केवळ ‘खडसे’ आडनावामुळे डावलणे चुकीचे आहे हा त्यांचा दावा योग्यच असल्याचे दिसून येत आहे.भाजपला फटका शक्यखासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेले खुले मत भारतीय जनता पक्षासाठी रावेर लोकसभा मतदार संघात पेच निर्माण करू शकते. ‘खडसे’ सून एवढीच ओळख न ठेवता रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघात कार्य केले आहे. मतदारसंघाच्या वाडी वस्तीपर्यंत जावून त्यांनी लोकांच्या समस्या सोडविल्या आहेत. पक्षाच्या माध्यमातून स्वत:च्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने या मतदार संघात उमेदवार बदलण्याबाबत विचार केल्यास पक्षाला अडचण येवू शकते.रक्षा खडसे यांची उमेदवारी डावलल्यास नवीन उमेदवाराला अन् पक्षालाही या मतदारसंघात अधिक ताकद लावावी लागणार आहे. कारण रक्षा खडसे यांचे भाजपतील समर्थक नाराज होणारच आहेत. परंतु केवळ ‘खडसे’ आडनावावरून उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती रक्षा खडसे यांच्याकडे जावून पक्षाला त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाला या बाबीवरही समर्पक उत्तराचीही तयारी ठेवावी लागणार आहे.त्यामुळे या मतदारसंघात भाजपने उमेदवारी बदलल्यास विरोधकांवर तुटून पडण्यासोबत पक्षाच्या अंतर्गत नाराजी थोपविण्यासाठी रणनिती आखावी लागणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजप आणि पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन या मतदार संघातील पेच कसा सोडविणार याकडेच लक्ष असणार आहे.
0 Comments