गावात पुढारपण करतात, असे धमकावत एकाने तलवारीने वार करत दोघांना गंभीर जखमी केले. वैजाली (ता. शहादा) येथील गजबजलेल्या बसस्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा हल्ला झाला. शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे
वैजाली (ता. शहादा) येथील बसस्थानक परिसर नेहमी गजबजलेला असतो. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक शांताराम बाजीराव धारपवार (रा. वैजाली) हा मोटारसायकलने आला. त्याने दोघांना उद्देशून पुढारपण करतात, असे धमकावत असतानाच मोटारसायकलच्या सीटखालून तलवार काढली. क्षणाचाही विलंब न पानटपरीवर उभे दोघांवर तलवारीने हल्ला केला. त्यात राहुल संजय पाटील (रा. वैजाली) व रवींद्र बन्सीलाल चव्हाण (रा. नांदर्डे) यांच्या हातांवर तलवारीच्या वार करीत गंभीर दुखापत केली.
तलवारीने हल्ला झाल्याचे कळताच धावपळ उडाली. त्यामुळे गावात भीतीने वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.याबाबत राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हल्लेखोर धारपवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हवालदार रामा वळवी तपास करीत आहे.
0 Comments